सातारा : राज्य शासनाच्या सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन करुन आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी फलटण तालुक्यातील पिंप्रदला ही कारवाई करण्यात आली.त्यानंतर बंडातात्या कराडकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनला छावणीचे स्वरूप आले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी महिला व काँग्रेस महिलांच्यावतीने पोवई नाक्यावर बंडातात्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.याबाबत माहिती अशी की, राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. याला अनेक ठिकाणी विरोध होत आहे. साताऱ्यातही गुरुवारी व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत आंदोलन झाले. हे आंदोलन बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले. या आंदोलनादरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली होती. तसेच यावेळी बंडातात्या यांनी राजकीय नेत्यांविरोधात जोरदार टीका केली होते.
यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. तर साताऱ्यातील या आंदोलनप्रकरणी कोरोना नियमांचे उल्लंघन करत व जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह सुमारे १२५ जणांवर साथरोग अधिनियम ३ तसेच इतर कलमाखाली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, साताऱ्यातील या आंदोलनानंतर बंडातात्या निघून गेले होते. साताऱ्यातील वक्तव्याप्रकरणी पोलीस त्यांची चौकशी करणार अशी पोलीसदलात चर्चा सुरु होती. असे असतानाच शुक्रवारी सकाळी फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यालयातून बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात येत आहे.बंडातात्या कराडकर यांनी या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर ‘ढवळ्याशेजारी बांधला पावळ्या.. वाण नाही पण गुण लागला'' अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. तर सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली होती. अखेर त्यांना हे वादग्रस्त प्रकरण भोवले.