सातारा : सातारा तालुक्यातील गाेवे गावच्या हद्दीत बर्फगोळा विक्रेत्याच्या डोळ्यात चटणी पूड चोळून तू भाजपचा प्रचार करतोय काय ? असे म्हणत मारहाण करून जबरदस्तीने मोबाइल नेणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तिघेही आरोपी फलटण तालुक्यातील आहेत. याप्रकरणात लोखंडी राॅड, चटणी पूड आणि वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. २७ एप्रिल रोजी गोवे, ता. सातारा गावच्या हद्दीत एकजण सरबत आणि बर्फगोळा विक्री करत होता. त्यावेळी दुचाकीवरून तोंडाला रूमाल बांधून तिघेजण आले. त्यांनी बर्फगोळा विक्रेत्याच्या डोळ्यात चटणी पूड चोळून तू भाजपचा प्रचार करतोस का, तुला लय मस्ती आली आहे का ? असे म्हणत लोखंडी राॅड, कोयत्याने मारहाण केली. यामध्ये संबंधित जखमी झाला. तसेच यावेळी चोरट्यांनी मोबाइल जबरदस्तीने नेला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्यानुसार निरीक्षक देवकर यांनी उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले. या पथकाने माहिती घेऊन रजत राजेंद्र निंबाळकर, प्रवीण दत्तात्रय शेलार आणि सुजित नामदेव मोरे (तिघेही रा. राजाळे, ता. फलटण) या तिघांना ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून दोन लोखंडी राॅड, मिरची पूड, दुचाकी, चाेरलेला मोबाइल हस्तगत करण्यात आला.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक देवकर, सातारा तालुका ठाण्याचे निरीक्षक काळे, सहायक पोलिस निरीक्षक पृश्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, अनिल मोरडे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे, अमोल माने, अजित कर्णे, राकेश खांडके, अजय जाधव, अमित झेंडे, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, स्वप्नील दाैंड, केतन शिंदे, दलजित जगदाळे, संदीप आवळे, मालोजी चव्हाण, राजू शिखरे, तुकाराम पवार, किरण जगताप, शिवाजी डफळे आदींनी सहभाग घेतला.
Satara: डोळ्याला चटणी चोळून लुटणाऱ्या तिघा चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
By नितीन काळेल | Published: May 03, 2024 7:49 PM