सातारा : येथील शाहूपुरी पोलिस ठाण्यातून अटकेतील तडीपार गुंड बेड्यांसह फरार झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे. या पोलिस ठाण्यात आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही आफत ओढावली.याबाबतची अधिक माहिती अशी की, नामदेववाडी झोपडपट्टी परिसरातील कैलास नथू गायकवाड हा तडीपार गुंड नुकताच साताऱ्यात फिरत असल्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले.
त्याला ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर केले. याठिकाणी त्याच्यावर १४१ कलम लावून त्याची चौकशी चालू असताना दुसऱ्या एका प्रकरणातील काही मंडळी पोलिस ठाण्यात आली.
ठाण्यातील कर्मचारी या मंडळींच्या तक्रारीकडे लक्ष देत असताना कैलास हळूच बाहेर सटकला.काही वेळानंतर कैलास गायब झाल्याचे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांची धावपळ सुरू झाली.दरम्यान, कैलास हा हातातील बेड्यांसह फरार झाल्याचे वृत्त पसरताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कैलासच्या शोधासाठी वेगवेगळ््या ठिकाणी पथके पाठवली आहेत. या पोलिस ठाण्यात अटकेतील आरोपींसाठी स्वतंत्र पोलिस कोठडी नसल्यामुळे ही आफत ओढावल्याचे स्पष्ट झाले आहे.