सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विसृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये पंधरा दिवसांपूर्वी नवातेवर उपचार सुरू होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली तरी त्याला कारागृहात नेण्यात आले नव्हते. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी कारागृहात नेण्यात येत होते. यावेळी त्याने जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये पाणी पिण्याचा बहाणा करून पोलिसाच्या हाताला हिसका देऊन पलायन केले होते.
गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत होते. पुण्यामध्ये नवाते असल्याची माहिती मिळाल्यानंतर एक पथक शनिवारी रात्री तेथे गेले. एका मित्राच्या घरामध्ये तो सापडल्याचे एका पोलिसाने सांगितले.दरम्यान, नवाते पळून गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एका पोलीस कर्मचाऱ्याला निलंबितही केले होते.विसृत नवातेवर सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, पुणे येथे विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. महिनाभरापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने त्याला साताऱ्यात शिताफीने अटक केली होती. नवाते पळून गेल्यानंतर पुन्हा याच पथकाने त्याला अटक केली.