सातारा : स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांसाठी आत्मदहनाची परंपरा यावर्षीही दिसून आली. पण, पोलिसांनी संबंधित चौघांना रोखून त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही नोंद केला आहे. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ घडून आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास सुरेश पांडुरंग जगताप (रा. खराडेवाडी, ता. फलटण) यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील पोवई नाका याठिकाणी असणाऱ्या निवासस्थानाजवळ पिशवीत रॉकेलने भिजवून आणलेली कपडे पेटवून देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सावकाराने बळकविलेली जमीन परत मिळावी म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना त्यापासून रोखले. तसेच त्यांच्यावर याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फलटण येथील सगुणामातानगर (मलठण) येथील हिम्मतराव धोंडिराम खरात यांनी वेतनभत्ते वाढ करण्याच्या कारणावरुन बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिसांनी वेळीच अटकाव केला. त्यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.जयवंत शिवदास कांबळे (शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा पालिकेतील भ्रष्टाचाराला आळा घालावा या मागणीसाठी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर परिवर्तन बाबासाहेब जानराव (मूळ रा. पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर. सध्या माळवाडी रोड शाहूपुरी, सातारा) यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावरही शहर पोलिस ठाण्यात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.