सातारा : ऊन, वारा, पावसासह कडाक्याची थंडी सोसत २४ तास आॅन ड्यूटी असणाऱ्या पोलिसांना वेळेवर जेवण व झोप मिळत नसते. विशेषत: महिलांना कौटुंबिक जबाबदारीसह पोलीस दलातील कर्तव्य पार पाडत असताना स्वास्थ्य बिघडले असेल तर सांगायचे कुणाला? परंतु यावर सातारा पोलिसांनी एक रामबाण उपाय शोधला आहे. खास महिला पोलिसांसाठी झुंबा डान्स क्लास सुरू केला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखत असताना पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. बंदोबस्त, गुन्ह्याचा तपास तसेच लोकांच्या संरक्षणासाठी खडा पहारा देताना त्यांच्या वेदना कोणी जाणून घेत नाही. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब यासारख्या अनेक आजारांनी आज पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाºयांना ग्रासले आहे.
कामाचा ताण आणि धावपळीमुळे स्वत:च्या व कुटुंबाच्या स्वास्थाकडे पाहण्यास पोलिसांना वेळच नसतो. त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य बिघडले तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये २४ तास पोलीस विभाग दक्षतेने कर्तव्य बजावत असतो. सर्वात जास्त धावपळ आणि ओढाताण महिला पोलीस कर्मचाºयांना सहन करावी लागत असते.यावर उपाय म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या कल्पनेतून सोशल वेल्फेअरच्या माध्यमातून खास महिला कर्मचाºयांसाठी पोलीस परेड मैदानातील सभागृहात एका खासगी क्लासच्या मदतीने झुंबा डान्स क्लास सुरू केला आहे. क्लासला महिला पोलिसांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.झुंबा हा लॅटीन डान्स आणि व्यायाम प्रकार आहे. भारतीय चित्रपटातील गाणी, मराठीतील सैराटसारख्या गाण्यावर झुंबा डान्स केला जाऊ लागला आहे. या डान्समुळे कॅलरीज बर्न होऊन संपूर्ण बॉडीचे वर्कआउट होते. दररोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत डान्स क्लास घेतला जाणार आहे.
झुंबा या डान्स प्रकारामुळे आपला व्यायाम तर होतोच, शिवाय डान्स करण्याचा आनंदही घेता येतो. सध्या या डान्स प्रकाराची महिलांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. तसेच त्यांची आवड हेरत पोलीस दलाच्या वतीने पुढाकार घेऊन क्लास सुरू केला आहे. त्यास प्रतिसाद मिळत आहे.-पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक.