सातारा : श्रीराम जय राम जय जय राम आणि जय जय रघुवीर समर्थच्या नामघोषात ३३६ व्या दासनवमी महोत्सवास सज्जनगडावर प्रारंभ झाला. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. यानिमित्ताने श्री रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळाच्या वतीने नऊ फेब्रुवारीपर्यंत म्हणजे दासनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सातारा तालुक्यातील सज्जनगड येथील मुख्य समाधी मंदिरात गुरुवारी पहाटे पाच वाजता काकड आरती करण्यात आली. समर्थ रामदास स्वामींच्या समाधीची षोडशोपचारे पूजा समर्थ रामदास स्वामीचे वंशज, महंत, मठपती, सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सकाळी आठ वाजता अध्यक्ष व अधिकारी भूषण स्वामी यांचे प्रवचन झाले. त्यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
यावेळी अन्नपूर्णा पूजन, पोती पूजन करण्यात आले. समर्थ सेवा मंडळाचे अभ्यंकरबुवा रामदासी, अभिराम स्वामी, उस्मानाबादचे मठपती रामचंद्र तडवळे, पांगरी मराठवाडा मठपती पांडुरंग बुवा, मंदारबुवा रामदासी, मीनाताई भावे, कमलाताई जबलपूर, रसिका ताम्हणकर यांच्यासह समर्थ संप्रदायाचे महंत, मठपती, मानकरी उपस्थित होते.
सकाळी साडेअकरा वाजता समाधी मंदिर ते पेठेतील मारुती मंदिर असा छबिना काढण्यात आला. यावेळी हलगीच्या गजरात रामा रामा हो रामा रामदास गुरू माझे आई, मजला ठाव द्यावा पायी, अशा भजनाच्या नामघोषात शिंग, तुतारीच्या गजरात छबिना काढण्यात आला. त्यानंतर समाधी मंदिरात आरत्याच्या जयघोषात १३ प्रदक्षिणा घालण्यात आल्या.
समर्थ सेवा मंडळाच्या वतीने श्रीधर कुटी येथे पहाटे काकड आरती, समर्थ पादुका षोडशोपचार पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी नितीन जोशी रामदासी यांनी दासबोध वाचन केले. त्यानंतर पुण्याचे डॉ. अजित कुलकर्णी यांचे प्रवचन, मकरंदबुवा रामदासी यांचे कीर्तन तर मृणाल नाटेकर, अभिजित अपस्तंभ (नांदेड) यांचा संगीताचा कार्यक्रम झाला. त्यांना सागर पटोकार आणि अभिजित सिनरकर यांनी साथ दिली.भक्तांसाठी सोय...सज्जनगडावर दोन्ही संस्थांच्या वतीने येणाऱ्या समर्थ भक्तांसाठी निवास, महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांना सहकार्य करण्यासाठी परळी ग्रामपंचायतीच्या वतीने कर्मचारी नेमण्यात आले आहेत.