सातारा : शहरालगत सैदापूर गावाच्या हद्दीत ‘स्पोर्टस् क्लब’च्या नावाखाली जुगार सुरू असल्याच्या संशयावरून तालुका पोलिसांनी रविवारी सायंकाळी एका ‘प्रतिष्ठित’ अड्ड्यावर छापा टाकला. मोठ्या फौजफाट्यानिशी केलेल्या या कारवाईत तब्बल ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, अनेक दुचाकी-चारचाकी वाहने, रोकड व इतर साहित्यासह लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरालगतच्या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेली बहुधा ही पहिलीच कारवाई आहे. सैदापूर (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या हद्दीत सातारा-मेढा रस्त्यावर स्वामी विवेकानंदनगर नावाची वसाहत आहे. मुख्य रस्त्यापासून आतील बाजूस असलेल्या या वसाहतीच्या टोकाला एक चारमजली प्रशस्त इमारत असून, तेथून पुढे कोंडवे गावची हद्द सुरू होते. या चारमजली इमारतीत तिसऱ्या मजल्यावर जुगार खेळला जात असल्याचा संशय पोलिसांना होता. शहरातील तसेच परजिल्ह्यांतीलही अनेक प्रतिष्ठित मंडळींचे येथे येणे-जाणे असल्याची माहिती मिळाली होती. रविवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली तालुका पोलिसांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी पैसे लावून खेळ खेळणे सुरू असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. कारवाई सुरू होताच तिसऱ्या मजल्यावर धावपळ उडाली. ‘यशवंत स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्ट’ असा फलक या मजल्यावर लावण्यात आला असून, ‘येथे जुगार किंवा मटका खेळला जात नाही,’ असे या सूचनाफलकावर लिहिल्याचे आढळले. तसेच ‘केवळ सभासदांनाच प्रवेश दिला जाईल,’ अशीही सूचना आढळली. छाप्याच्या वेळी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम या ठिकाणी आढळली. त्यावरून येथे जुगार खेळला जात असल्याचे स्पष्ट होते, असे पोलिसांनी सांगितले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव, निरीक्षक दत्तात्रय नाळे, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे, आदी अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. अड्ड्यावर आढळलेल्या मंडळींची चौकशी करून त्यांना तिसऱ्या मजल्यावरून खाली आणले जात होते आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसविले जात होते. दोन व्हॅन ठासून भरल्या, तरी कारवाई सुरूच होती. दुसरीकडे, या मंडळींच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या वाहतूक पोलीस ताब्यात घेत होते. त्यांच्या दोन क्रेन दुचाकी वाहनांनी तुडुंब भरल्या होत्या. तसेच ‘व्हीआयपी नंबर’ असलेल्या अनेक चारचाकी गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या. (प्रतिनिधी)तिसऱ्या मजल्यावरून उडीपोलीस इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दाखल होताच धावपळ उडाली. यावेळी एकाने घाबरून तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली उडी मारली. निसार गुलाब अत्तार (वय ३५, रा. वडूज) असे त्याचे नाव आहे. आपण चालक असल्याचे त्याने जबाबात सांगितले आहे. तो गंभीर जखमी झाला आहे.
सातारा : ‘प्रतिष्ठित’ अड्ड्यावर छापा !
By admin | Published: March 30, 2015 12:05 AM