खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. दळणवळण व वाहतूक गतिमान होण्यासाठी महामार्गात हे बदल करण्यात आले असलेतरी कामे खोळंबल्याने अडचणी वाढत आहेत. वास्तविक, या महामार्गाचे रुपांतर आशियाई महामार्गात केले असले तरी हा बदल केवळ नावापुरताच दिसून येतोय. महामार्गालगतच्या गावांच्या अडचणी मात्र तशाच असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.
पुणे-बेंगलोर हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४ म्हणून ओळखला जात होता. वाहतुकीच्या अडचणी दूर करण्यासाठी या मार्गाचे सुरुवातीला चौपदरीकरण व त्यानंतर सहापदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. या कामादरम्यान अनेक गावातील रस्त्यालगतच्या अडचणी वाढत गेल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यापूर्वी केवळ नावात बदल करून त्याचे नामकरण आशियाई महामार्ग ४७ असे करण्यात आले आहे. त्यामुळेही समस्या सुटलेल्या नाहीत.
खंडाळा तालुक्यात पारगाव येथील महामार्गालगत दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यांचे रुंदीकरण करणे, अंडरपास बोगदा, दोन्ही बाजूंनी काँक्रीट भिंत बांधून बंदिस्त गटार करणे, अंडरपास एलईडी दिवे बसविण्यात यावेत, सेवारस्त्यालगत दोन्ही बाजूने गटार काढणे, बसस्थानकासमोरील बोगद्यात लोखंडी, अथवा स्टील खांब बसविण्यात यावेत, गाव हद्दीत रस्त्याच्याकडेला दुतर्फा विजेची सोय करणे, अशी अनेक कामे अपूर्ण आहेत. त्याचबरोबर शिरवळ येथील पंढरपूर फाटा या ठिकाणी पुलाचे काम करणे गरजेचे आहे.
खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस वळणाचा धोका अद्यापही कायम आहे. या ठिकाणी केवळ इंडिकेटर व रस्त्यावर रबर स्ट्रीप लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यामुळे कायमस्वरुपी समस्या संपलेली नाही. त्यामुळे नावात बदल होत असताना कामातही तत्परतेने तोडगा, निघावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.