सातारा : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी रविवारी (29 जुलै) सकाळी अकराच्या दरम्यान पोलीस मुख्यालयासमोर सातारकरांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील 120 वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यामध्ये सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संदीप पाटील यांनी साता-यातील नामचिन गुंडांवर मोक्का व तडीपारीच्या कारवाया करून गु-हेगारांवर वचक बसवला. तसेच राज्यात गाजलेला ज्योती मांढरे यांच्या हत्येचा छडा लावून डॉ. संतोष पोळ या सीरियल किलरला अटक केली. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याचा क्राईम रेट कमी झाला. त्यांच्या कामामुळेच त्यांनी सातारकरांची मने जिंकली.
शुक्रवारी त्यांची बदली झाल्याची बातमी ऐकल्यानंतर बदली रद्द व्हावी, यासाठी सोशल मीडियावर स्वाक्षरी मोहीम सुरू झाली होती. रविवारी सकाळी अकरा वाजता मुख्यालयासमोर शांतिदूत पक्ष्याच्या पुतळ्यानजीक बसून सातारकरांनी धरणे आंदोलन सुरू केले. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रमेश बोराटे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेंबडे, सुशांत मोरे, माजी नगराध्यक्ष विजय बडेकर, भगवानराव शेवडे, भारिप बहुजन महासंघाचे गणेश भिसे व सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.