सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे लिपिक प्रशांत निकम यांना व्यावसायिकांकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेचा हॉकर्स संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला. राजवाडा परिसरातील फळविक्रीची सर्व दुकाने शुक्रवारी सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली होती.अतिक्रमण काढून माल जप्त केल्याचा आरोप करीत चार व्यावसायिकांनी पालिकेचे लिपिक प्रशांत निकम यांना कार्यालयात घुसून बेदम मारहाण केली होती. डोक्यात वजनकाटा घातल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी चारही व्यावसायिकांना अटक केली आहे.या घटनेच्या निषेधार्थ पालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी कामबंद आंदोलन करून राजवाडा परिसरातील सर्व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.
दरम्यान, शुक्रवारी हॉकर्स संघटनेच्या वतीनेही लिपिकाला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच फळविक्रीची दुकाने बंद ठेवून आंदोलन केले. या आंदोलनाला हॉकर्स संघटनेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.