सातारा : सार्वजनिक विश्वस्त कायद्यातील कलम क्रमांक ३६ मुळे देवस्थान इनाम वर्ग ३ च्या बाबतीत अनेक ठिकाणी गैरगोष्टी घडल्या आहेत. ३६ वे कलम अनेकांच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. हे कलम रद्द करण्याचा ठराव पुजारी महासंघाचे अध्यक्ष नेताजी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे, अशी माहिती महासंघाचे संघटक शिवाजीराव गुरव यांनी दिली.मंदिर ही राज्यातील मोठी संस्था असल्याने मंदिर, मठ आणि इनाम वर्ग ३ बाबत विधिमंडळात चर्चा न होता, वटहुकूम निर्णय घेण्याचा प्रयत्न होऊ नये, अन्यथा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनावर अनिष्ठ परिणाम होऊ शकतो, असे अनेक ठराव यावेळी करण्यात आले.
मंदिरातील अनिष्ट रुढी आणि अंधश्रद्धा पसरविणाऱ्या प्रथा नष्ट करण्यासाठी पुजारी लोकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, मंदिरातील दानपेटीची व मौल्यवान वस्तूंची चोरी, मंदिराची मूळ ट्रस्ट सोडून वेगळीच योजना तयार करून मंदिरातील निधीचा गैरवापर, मंदिराच्या जागेत होणारे इतरांचे अतिक्रमण या विषयांवर तुकाराम गुरव, प्रदीप गुरव, सुहास गुरव, किसन क्षीरसागर, लक्ष्मण मेणवलीकर, अरविंद शेंडे, विजय गुरव, दयाराम पोरे, मारुती गुरव, दिनकर गुरव आदी कार्यकर्त्यांनी चर्चेत सहभाग घेतला.महासंघाचे कार्याध्यक्ष अरविंद गुरव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. सचिव नारायणराव गुरव यांनी आभार मानले.