आदर्की : ब्रिटिशकाळात सुरू झालेली पुणे-आदर्की-मिरज रेल्वेलाईनची मीटर गेज सुरू झाली. त्यानंतर स्वातंत्र्यात ब्रॉड गेज रेल्वेलाईन सुरू झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला वाहतुकीचा मार्ग सुकर झाला. आता ब्रॉड गेज लाईनचे दुहेरीकरणात मातीचे भराव टाकण्याचे काम जागोजागी सुरू झाल्याने आता मालवाहतुकीबरोबर प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, मिरज, सांगली, कोल्हापूर जिल्हे रेल्वे लाईनने जोडण्यासाठी ब्रिटिशकाळात पुणे-मिरज रेल्वेलाईन टाकताना पुणे, घोरपडी, राजेवाडी, जेजुरी, धोंडज, वाल्हे, नीरा, लोणंद, सालपे, आदर्की, वाठार स्टेशन, पळशी, सातारा रोड, कोरेगाव, रहिमतपूर, तारगाव, मसूर, कऱ्हाड , वांगी, भिलवडी, ताकारी आदी स्टेशन मीटर गेज रेल्वेलाईनला होती. दरम्यानच्या काळात कोळशाच्या वाफेवर चालणारी इंजिन वापरात होती. त्यामुळे वेगाला मर्यादा होत्या. तर मालवाहतूक करण्यातही मर्यादा होत्या.पुणे-साताऱ्यांपर्यंत आंबळे-शिंदवणे, जेजुरी-वाल्हे, सालपे-वाठार स्टेशन अवघड घाट, मोठमोठ्या डोंगरातून वेडीवाकडी वळणे होती. मीटर गेज रेल्वेलाईनला आदर्की येथे बोगदा होता. त्यानंतर ५० वर्षांपूर्वी ब्रॉड गेज रेल्वेलाईन टाकण्याचे काम सुरू होऊन त्याचे सर्वेक्षण करताना नवीन रेल्वेस्थानके अंमलात आणली तर काही रेल्वेस्टेशनची जागा बदलली.
ब्रॉड गेज रेल्वेलाईनवर सासवड रोड, फुरसंगी, आळंदी, शिंदवणे, आंबळे, जरेंडश्वर, सातारा ही नवीन झाली, तर आदर्कीत जुन्या बोगद्यातून ब्रॉडगेज रेल्वे गेली तर आदर्कीत नवीन बोगद्याबरोबर शिंदवणे ते आंबळे स्टेशनदरम्यान नवीन तीन बोगदे खोदून मीटर गेज रेल्वेलाईन काढून ब्रॉडगेज रेल्वे लाईन सुरू झाली.