सातारा : सातारा-पुणे अथवा पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पी. एस. टोल रोड प्रा. लि. व महामार्ग प्राधिकरणने टोलवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, दि. १ एप्रिलपासून सुधारित टोलवाढ लागू केली जाणार आहे.टोल रोड प्रा. लि. व महामार्ग प्राधिकरणाच्या करारानुसार दरवर्षी टोलचे दर वाढत असतात. यंदादेखील टोलमध्ये दरवाढ करण्यात आली असून, आनेवाडी टोलनाक्यावरून ये-जा करताना आता वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. कार, जीप व्हॅन किंवा हलक्या माेटार वाहनांकडून एका बाजूच्या प्रवासाकरिता ८० रुपये टोल आकारला जाणार आहे, तर हलके व्यावसायिक वाहन किंवा मिनी बससाठी १३५ रुपये, बस किंवा ट्रकसाठी २८० रुपये, जड बांधकाम मशिनरी किंवा मल्टी ॲक्सल वाहनांसाठी ४३५ रुपये तर मोठ्या आकाराच्या वाहनांसाठी ५३० रुपये टोल आकारला जाणार आहे. टोल नाक्यापासून २० किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना मासिक पाससाठी ३४० रुपये मोजावे लागणार आहे.महामार्गामुळे दळणवळण अधिक गतिमान झाले. परंतु महामार्ग प्राधिकरणकडून प्रवाशांना पायाभूत सेवा-सुविधांची पूर्तता केली जात नसल्याची ओरड प्रवाशांमधून वारंवार केली जाते. अशा परिस्थितीत टोल दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना काही अंशी फटका बसणार आहे. आनेवाडीबरोबरच खेड-शिवापूर टोलनाक्यावरही एक एप्रिलपासून सुधारित टोलवाढ लागू होणार आहे.
सातारा-पुणे प्रवास महागला, एक एप्रिलपासून सुधारित टोलवाढ लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:57 PM