खंडाळा (सातारा) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा बोरीचा बार गुरुवारी खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावाच्या सीमेवर रंगला.
सुखेड-बोरी दोन गावांतील महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली. यावर्षी पाऊस नसल्याने ओढ्याला पाणी नव्हते. त्यामुळे हजारो महिलांनी कोरड्या ओढ्यातच शिव्यांचा पाऊस पाडला.सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला हलगीचा कडकडाट सुरू असतो. दोन्ही बाजूंकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो अन् प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते.सुखेड व बोरी या दोन्ही गावांतील शेकडो महिलांनी वाजत-गाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन पूजा केली. त्यानंतर गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी बोरीचा बार सुरू झाला. तो पाऊण तास चालला.
जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून शेकडो लोक दाखल झाले होते. अनेक तरुणांनी हा सोहळा आपल्या मोबाईलमध्येही कैद केला. या सोहळ्यानंतर दोन्ही गावांमध्ये यात्रेला सुरुवात झाली.ओढ्याच्या दोन्ही किनाऱ्यांवरून महिलांनी एकमेकींना हातवारे करत ओढ्याच्या पात्रात उतरल्या. परंतु पात्रात पाणी नसल्याने अस्सल गावारान शिव्यांची लाखोली वाहिली. सुमारे पाऊण तास एकमेकींना शिव्या देऊन हा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला. लोणंद पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.