लोणंद (सातारा) : निरा रस्त्यावर पाडेगाव हद्दीतील धोकादायक ठरत असल्याने टोलनाका शेड काढून टाकण्यात आले परंतु शेडचा अर्धवट अवस्थेतील पाया, रस्ता दुभाजक धोकादायक अवस्थेत उभा आहे. रात्री अंदाज न आल्याने या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. ते टाळण्यासाठी साथ प्रतिष्ठानतर्फे रिफ्लेक्टर बसविण्यात आले.लोणंद-निरा रस्त्यावर पूर्वी टोलनाका होता. त्या ठिकाणी जाणारे आणि येणाऱ्या वाहनांकडून टोलवसुलीसाठी वसुली केंद्र तयार केले होते. तसेच तेथे एकावेळी एकच वाहन जाईल एवढी जागा जोडून रस्ता दुभाजक केले होते.दरम्यानच्या काळात हा टोलनाका बंद झाला. पण टोलनाका व्यवस्थापनाने त्यानंतर सर्व अडथळे हटवून रस्ता रिकामा केलाच नाही. रस्ता दुभाजक, थांबा तेथेच आहेत. हे दुभाजक रात्री दिसत अथवा कळत नाहीत.
अंदाज न आल्याने मोठा अपघात होऊन जिवीत हानी होऊ शकते. तसेच वाहनांचे नुकसान ही होऊ शकते. याचमुळे लोणंद येथील ह्यसाथ प्रतिष्ठानह्ण या सामाजिक संघटनेचे वतीने येथील रस्ता दुभाजक, कठडे रात्री वाहन चालकांना दिसावेत यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रेडीयम व रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत.यासाठी पाडेगावचे सरपंच हरिश्चंद्र माने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, प्रशांत ढावरे, दिपक बाटे, कृष्णात गुलदगड, नवनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.