जगदीश कोष्टी।सातारा : दुचाकींवरून चाललेल्या महिलांना आडरानात अडवून छेडछाड, लूटमारीच्या घटना वारंवार घडतात. मोबाईल प्रत्येकांकडे असला तरी कोणाकडे मदत मागायची हेच समजत नसल्याने वेळीच मदत मिळत नाही. यावर पर्याय म्हणून जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर नव्याने फलक लावले आहेत. यामध्ये संबंधित पोलिस ठाणे, पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिकांचे नंबर दिले आहेत.
शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने शेकडो तरुणी घरातून बाहेर पडल्या आहेत. अनेक ठिकाणी दुचाकीवरून त्या नोकरीच्या ठिकाणी जातात. अशावेळी एकटीने प्रवास करण्याची वेळ येते. याचाच फायदा घेऊन काही तरुण आडरस्त्यात त्यांना अडवून छेडछाड करणे, लूटमारीचा प्रयत्न करतात. यातून अनेकदा पुरुषांनाही फटका बसतो.
या घटना सोलापूर जिल्ह्यात वेळापूर येथील ग्राहक प्रबोधन समितीचे कार्य करत असलेल्या उद्योजिका लक्ष्मी थोरात यांना अस्वस्थ करत होती. यावर काहीतरी केले पाहिजे, असा त्या विचार करत होत्या. रस्त्यावरच त्यांच्या मदतीसाठी फलक लावले तर, ही संकल्पना समोर आली अन् त्यांनी काम सुरू केले.
पोलिस अधीक्षक, संबंधित पोलिस ठाण्यांशी त्यांनी पत्रव्यवहार केला. त्यालाही या यंत्रणेकडून चांगली मदत मिळाली. केवळ प्रोत्साहन मिळून काही होणार नव्हते. त्यासाठी आर्थिक मदतही महत्त्वाची होती. लक्ष्मी थोरात यांनी स्वत: खर्च करण्याचा निर्णय घेतला. जेथे गरज भासेल तेथे पोलिसांनी मदत उपलब्ध करून दिली. रस्त्यांची निवड करून आकर्षक फलक तयार केले. त्यावर संबंधित पोलिस ठाणे, पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका यांचे क्रमांकही दिले आहेत.अभ्यास करून फलक तयारसातारा जिल्ह्यातील दहिवडी, कोरेगाव, वाई, पुसेगाव, वडूज परिसरातील रस्त्यावर फलक प्रत्यक्षात लागले आहेत. वाहनचालकांचे लक्ष कसे वेधून घेतील, दीर्घकाल कसे टिकतील? याचा अभ्यास करून फलक तयार केले आहे. यावर स्थानिक पोलिस ठाणे, महिला मदतीचे १०९१, पोलिस मदत केंद्र १०० तसेच रुग्णवाहिकेचे १०८ तसेच अन्य मदतीचे क्रमांकदिले आहे ग्रामीण भागातून हेल्पलाईनबाबत अद्याप म्हणावी अशी जनजागृती झालेली नाही. त्यामुळे भविष्यात ग्रामीण भागात मदतीचे फलक लावण्याचा संकल्प आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, बालकांच्या मदतीसाठी असलेले ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्याचा लक्ष्मी थोरात यांचा मनोदय आहे.
प्रत्येक गोष्टीसाठी प्रशासकीय यंत्रणांवर अवलंबून राहणे चालणार नाही. त्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातून पुढाकार घेणे गरजेचे आहे. हद्द सुरू होते तेथे फलक लावलेले असतात. त्यावरही जनजागृती करता येऊ शकते. हा उपक्रम केवळ सातारा, सोलापूर जिल्ह्यापुरता न राहता राज्यभर व्हावा, अशी अपेक्षा आहे.- लक्ष्मी थोरात.