सातारा : चाकूचा धाक दाखवून एका युवकाला व एका विवाहित महिलेला लुटल्याची खळबळजनक दोन घटना बुधवारी सायंकाळी सातारा शहराजवळ घडली. दोघांकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीस गेल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश सुधाकर पवार (वय २१,मूळ रा. रावगाव ता. करमाळा. सध्या रा. आदित्य नगरी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर सातारा) हा एका फायनान्स कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता गणेश हा म्हसवे गावच्या हद्दीतील माईलस्टोन हॉटेलजवळून येत असताना त्याला दोन युवकांनी अडवले.
त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल तसेच १ लाख ५६ हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. या प्रकारानंतर गणेश याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.दुसरी घटना औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. प्रतीक्षा गिरीष नारकर (वय २१, रा. चिमणपुरा पेठ, सातारा) ही युवती कंपनीतून कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली होती. फुलोरा चौक ते कल्याण रिसॉर्टदरम्यान ती चालत जात असताना बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तीनजणांनी तिला अडवले.
धाक दाखवून मंगळसूत्र, अंगठी त्यांनी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर तिची पर्स घेऊन चोरट्यांनी पलायन केले. या घटनेनंतर घाबरलेल्या प्रतीक्षाने आपल्या घरी हा प्रकार सांगितला. शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.