सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी सुप्रसिध्द संतूर वादक पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादन तर पंडित विजय घाटे यांनी तबला वादन केले.
यावेळी संतूर अन् तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. शिल्पा पुणतांबेकर यांनीही शास्त्रीय गायन व अभंगवाणी समर्थ चरणी अर्पण करुन या महोत्सवात रंगत वाढवली.शिल्पा पुणतांबेकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात श्री रागातील मध्यलय त्रितातालातील ह्यमाई चलो रामसिया दर्शन कोह्ण या बंदिशीने करत अभंगवाणीला सुरुवात केली.
यामध्ये रामछबी अतिसुंदर, अमृताहूनी गोडनाम तुझे देवा, विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी. बोलू ऐसे बोले जेणे विठ्ठल डोेले, कौसल्येचा राम माझा हे पद सादर करुन आपल्या अभंगवाणीची सांगता केली.पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादनाची सुरुवात श्री रागातील मध्य लयीतील वादनाने केली. त्यात त्रिताल, विलंबीत व द्रूत लयी सादर करुन दाखवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पंडित विजय घाटे यांनी तबल्यावर काढलेल्या टप्पे, झालाची पेशकश अतिशय सुरेख होती. यातच द्रुत लयीत संतूर व तबल्याची जुगलबंदी होत असताना वेगवेगळ्या खंडजाती व मिश्र जातीच्या लयकारींचे दर्शन घडवत वादनातील सवाल जबाब ही सादर झाले.
पूर्वार्धातील शिल्पा पुणतांबेकर यांना संवादिनी साथ दिप्ती कुलकर्णी तर तबल्यावर साथ समीर पुणतांबेकर यांनी केली. ज्येष्ठ वादक माउली टाकळकरांच्या टाळांची साथ ही अभंगवाणीचा गोडवा अधिक वाढवणारीच होती.अजेयबुवा देशपांडे रामदासी व रमेशबुवा शेंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अरविंंदबुवा रामदासी, योगेश बुवा रामदासी, मकरंदबुवा रामदासी, गोविंदराव बेडेकर, डॉ. समीर सोहोनी, मीनाताई देशपांडे आदी उपस्थित होते.