सातारा : साताऱ्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी उस्मानाबाद येथील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. तडीपार, मोक्कासारख्या धडक कारवाईने सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी जवळपास संपुष्टात आली असतानाच संदीप पाटील यांची अचानक बदली झाल्याने सातारकर अक्षरश: गहिवरून गेले आहेत.अधीक्षक संदीप पाटील यांनी जून २०१६ मध्ये सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारला होता. त्या अगोदर ते संवेदनशील असणाऱ्या गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. गडचिरोलीतून साताऱ्यात हजर होत असताना त्यांनी बुके नको, बुक आणा असे सातारकरांना आवाहन केले होते.
जिल्हावासीयांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले होते. जमा झालेली ही सर्व पुस्तके त्यांनी गडचिरोली येथील नागरिकांना पाठवून एक नवा पायंडा घातला. अशा प्रकारे त्यांनी पुस्तकप्रेमी म्हणून आपली ओळख निर्माण केली होती.शांत आणि संयमी गुण असणाऱ्या अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा शहरासह जिल्ह्यातील खासगी सावकारी, खंडणीखोर, गुंडगिरी, पर्यटनस्थळी लूटमार करणाऱ्या टोळींचा अक्षरश: बिमोड केला. एवढेच नव्हे तर संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला.
शंभरहून अधिकजणांना त्यांनी तडीपार केले. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच जिल्हा पोलीस दलाचा क्राईम रेट कमी झाला. त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे नामचीन गुंडापासून अगदी गल्लीबोळापर्यंत भलेभले हाबकून गेले. तीनपेक्षा जास्त गुन्हे केले तर आपल्याला तडीपार व्हावे, लागेल याची धास्ती असल्यामुळे गुन्हेगारांचे उपद्रव कमी झाले.त्यामुळे साताऱ्यात साहजिकच शांतता नांदू लागली. सर्वसामान्य जनतेत सुरक्षितततेची भावना निर्माण झाली.खातेअंतर्गत शिस्त लागावी, यासाठी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. आत्तापर्यंत ३० हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी निलंबित केले आहे. सातारा जिल्ह्यात खासगी सावकारी बोकाळली होती. खंड्या धाराशिवकर सारख्या खासगी सावकराच्या त्यांनी मुसक्या आवळल्या. दत्ता जाधव टोळीचाही त्यांनी पर्दाफाश केला.
सातारा शहरात एकही गुंड त्यांनी शिल्लक ठेवला नाही. एका मागून एक अशा तडीपारीच्या कारवाई करत त्यांनी २५ टोळ्यांतील शंभरजणांना तडीपार केले. हीच पद्धत त्यांनी मोक्कामध्ये लावली. आत्तापर्यंत कधीच मोक्कातर्गंत कारवाया झाल्या नव्हत्या. तेवढ्या पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केल्या. शंभर जणांवर मोक्कातंर्गत कारवाई करणारे संदीप पाटील हे पहिले पोलीस अधीक्षक आहेत.बदली रद्दसाठी धरणे आंदोलनाचा इशारापोलीस अधीक्षकांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी रविवारपासून मूक धरणे आंदोलन करण्याचा इशारा साजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी दिला आहे. तसेच सोशल मीडियावरही त्यांची बदली रद्द व्हावी, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला सातारकरांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.