खंडाळा : राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा...असं अभिमानाने म्हणतो. सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी महाराष्ट्राचा प्रदेश कणखर बनला आहे. याच डोंगररांगांच्या शिरावर अनेक गड, किल्ले भक्कमपणे उभे राहिले आहेत. इतिहासाची साक्ष देणारा हा ठेवा डोळे भरून पाहावा, यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असतात. अशाच भ्रमंतीच्या वेडातून खंडाळा येथील शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने अतिशय अवघड ठिकाणे पार करून भ्रमंतीची शंभरी पूर्ण केली.महाराष्ट्राचा इतिहास वाचला अन् प्रत्यक्ष पाहून अनुभवला पाहिजे, या उद्देशाने अभियंता असलेल्या श्याम जाधव यांनी खंडाळ्यात शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी प्रवृत्त केले आहे. अनेक गडकिल्ल्यांसह विविध ठिकाणांना ग्रुपने पायी चालत जाऊन भेटी दिल्या आहेत.यामध्ये कळसूबाई शिखर, नळीच्या वाटेने हरिश्चंद्र गड, नागेश्वर-वासोटा, राजगड, तोरणा, रायगड, कर्दळी बन, संधन व्हॅली, ढाक भैरी, तैला-बैला यासह लिंगाण्यासारख्या अवघड चढाईसुद्धा यशस्वी केली आहे. या ग्रुपने नुकताच जांभवली-ढाकभैरी ते भीमाशंकर हा शंभरावा ट्रेक पूर्ण केला. डोंगरदऱ्यातून असणारी सुमारे चाळीस किलोमीटरची वाट तेरा तासांत चालून पूर्ण केली.ऐतिहासिक ठिकाणांची पाहणी करण्याबरोबरच तेथील स्वच्छता करणे, निसर्गाची निगा राखणे असे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर चालण्याने आयुष्य वाढते, असे म्हणतात त्यासाठी सर्वच ट्रेक पायी चालत घेतले जातात. तरुणांमध्ये व्यायामाची सवय यामुळे निर्माण होऊ लागली आहे.
महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक ठिकाणे पाहणे हा वेगळा अनुभव आहे. त्यातून आपला इतिहास जाणून घेणे, तो संवर्धित करणे यासाठी तरुणांचा पुढाकार उल्लेखनीय आहे. यापुढे आणखी तरुणांना अशा मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.- श्याम जाधव,संस्थापक