सातारा : ९ ते १५ सप्टेंबर रोजी बालेवाडी पुणे येथे नॅशनल रायफल असोसिएशन पुरस्कृत आॅलिम्पिक पदक विजेता गगन नारंग यांच्या ‘गन फॉर ग्लोरी’ स्पोर्ट फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत शिवराज ससे शूटिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी दहा मीटर एअर पिस्टल या खेळाच्या प्रकारात तीन पदके मिळविली.यामध्ये सांघिक गटामध्ये विक्रम शिंदे सुवर्ण पदक, प्रदीप घाडगे रौप्य व वैभव निकम याने कास्य पदक पटकावले. गुरुकुल स्कूलची विद्यार्थिनी आर्या जाधव हिने ३५९ गुण प्राप्त करत चौथा क्रमांक पटकाविला.यशस्वी खेळाडूंचे प्रशिक्षक शिवराज ससे, अॅकॅडमीचे संचालक प्रदीप ससे, संचालिका चारुशीला ससे, कविता चोरगे यांनी कौतुक केले. या विजेत्या खेळाडूंना महेश घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. कॉमनवेल्थ स्पर्धा २००८ मधील सुवर्णपदक विजेता व हरियाणाचा खेळाडू अंकुश भारद्वाज याने खेळाडूंना स्पर्धेसाठी तयारी कशी करावी, व्यायाम, आहार अशा अनेक टिप्स देऊन मार्गदर्शन केले.सातारा येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेतही अॅकॅडमीच्या खेळाडूंनी यशस्वी कामगिरी करत नऊ पदके मिळविली. यामध्ये १४ वर्षे वयोगटांत आकाश कुंभार कास्य, मुलींच्या गटात आर्या जाधवने सुवर्ण, प्रणया पवारने कास्य, १७ वर्षे वयोगटांत कुणाल ससे याने सुवर्ण, विक्रांत निकम रौप्य व रोहन साळुंखे याने कास्य पदक पटकावले. १९ वर्षे वयोगटांत वैभव निकम याने सुवर्ण, आदर्श जाधव रौप्य तर मुलींच्या गटात मयुरी सपाते हिने सुवर्णपदक मिळविले. जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, क्रीडाधिकारी सुनील धारोरकर यांनी कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गिरिजा पाटील यांच्यासह अनेकजणांनी विशेष परिश्रम घेतले.यशस्वी खेळाडूंचे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सदस्य राजेंद्र चोरगे, धनंजय थोरात, विजय पवार, संजय कदम, प्रदीप ससे, जगदीश खंडेलवाल, नितीन माने, मधुकर जाधव, उदय गुजर, दीपक मेथा, सातारा जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव कन्हैयालाल राजपुरोहित यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)
सातारच्या नेमबाजांनी साधला अचूक वेध!
By admin | Published: September 30, 2015 10:15 PM