पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावरील काचांच्या तुकड्यांमुळे कचरा, घाणीच्या साम्राजामुळे निसर्गरम्य कासचा श्वास घाणीत घुटमळू लागल्याने कास तलावाला स्वच्छतेची प्रतीक्षा लागून राहिली आहे. या पर्यटनस्थळी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घाणीच्या साम्राज्याने निसर्गप्रेमी नाराजी व्यक्त करू लागले आहेत.मद्याच्या बाटल्या, पिशव्या, कागदी बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ बनला असून, पाणी प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. ठिकठिकाणी चुली मांडून धुराचे लोटच्या लोट व तेथीलच परिसरातील सरपण गोळा करून हवेच्या प्रदूषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.
दरम्यान, शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी गाडीतील कर्णकर्कश डेकवर काही तरुणाई थिरकत असल्याने कास तलावावर पाणी पिण्याच्या मार्गावर असणाऱ्या वन्य पशुपक्ष्यांना आपला मार्ग बदलावा लागत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कास तलावाचा परिसर स्वच्छ होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. दर आठवड्याला स्वच्छता मोहिमा राबविल्या गेल्या तरी काहीजणांकडून पुन्हा कचऱ्यात वाढच होताना दिसत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.संस्कार मोहिते, पर्यावरणप्रेमी, सातारा