लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘कोरोनाकाळात सातारा पालिकेकडून जनतेला मदत मिळणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेच नाही. सकाळी जेव्हा घंटागाडीवर गाणे वाजते तेव्हाच शहरात नगरपालिका असल्याची याची जाणीव होते,’ अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
नगरसेवक विजय काटवटे यांनी अयोध्या फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रविवारी फाऊंडेशनला मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक विजय काटवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवक काटवटे यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, अशा प्रकारचे काम पालिकेने करणे अपेक्षित होते. शहरातील पालिकेच्या शाळेत विलगीकरण कक्ष सुरू करणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. पालिका संकटकाळात जनतेला मदत करेले असे वाटत होते. दुर्दैवाने तसेही झाले नाही. सकाळी जेव्हा घंटागाडीवर गाणे वाजते तेव्हाच शहरात नगरपालिका असल्याची जाणीव होते. चंद्रकात पाटील, विक्रम पावसकर यांनीही काटवटे यांच्या कामाचे कौतुक करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.