मायणी (सातारा) : शिवकालीन मार्ग म्हणून इतिहासात नोंद असलेल्या सातारा-औंध-पंढरपूर व मल्हारपेठ-पंढरपूर या राज्य मार्गावर दिवसभर एकही बस धावत नसल्याने प्रवाशांना अन्य खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही सातारा, कऱ्हाड , वडूज, पाटण, पंढरपूर आगार प्रमुखांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.सातारा औंध मायणी, दिघंची, महूद, पंढरपूर या मार्गाची शिवकालीन मार्ग म्हणून ओळख आहे. महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा रस्ता म्हणूनही याकडे पाहिले जात होते.
मल्हारपेठ-पाटण-उंब्रज-मसूर-मायणी-झरे-महूद-पंढरपूर हा राज्यमार्ग आहे. हे दोन्ही मार्ग सातारा, कऱ्हाड , खटाव, कोरेगाव, पाटण या तालुक्यांसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, आटपाडी, खानापूर तालुक्यांतून जातो.या दोन्ही मार्गांवर मायणी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणावरून सातारा ७९, मल्हारपेठ ६५, पंढरपूर ९४ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र सातारा वगळता दिवसभर मायणी गावातून मल्हारपेठ, कऱ्हाड , पाटण, मसूर, पंढरपूरकडे जाण्यासाठी एकही बस नाही.
त्यामुळे प्रवाशांना विटा, कऱ्हाडमार्गे पाटण, मल्हारपेठला जावे लागते. पंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा, खानापूर किंवा म्हसवडमार्गे जावे लागते.आषाढी, कार्तिक या मोठ्या एकादशीसह महिन्यात येणाऱ्या एकादशींना पंढरपूरकडे जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असते. या मार्गावर एसटी बस नसल्याने या भक्तांना अन्य मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो.
या मार्गाशी संबंधित कऱ्हाड , पाटण, कोरेगाव, सातारा, पंढरपूर व खटाव तालुक्यांतील वडूज आगारांना एसटी बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार होत आहे. मात्र त्याकडे सर्व आगारप्रमुखांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंडसह वेळ खर्च करावा लागत आहे.तीस किलोमीटरचा अधिक प्रवासपंढरपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना विटा व म्हसवडमार्गे पंढरपूरला जावे लागते. त्यामुळे वीस ते तीस किलोमीटर अधिक प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ व पैसा अधिक खर्च होतो....म्हणे प्रवासीच कमीकऱ्हाड -पंढरपूर, कऱ्हाड -सोलापूर, पाटण-पंढरपूर, मायणी-पंढरपूर आदी बसेस पूर्वी या मार्गावर सुरू होत्या. मात्र प्रवाशांची संख्या कमी आहे. हे कारण पुढे करून या सर्व बसेस संबंधित आगाराने बंद केल्या.