सातारा : यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे.यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावली. त्यानंतर संततधार पाऊस सुरू राहिला. त्यामुळे आॅगस्ट महिन्यातच कोयना धरण भरले. परिणामी सततच्या पावसामुळे आवक वाढल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कोयना नदीला पूरही आला. परिणामी नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या.सध्या गेल्या दहा दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप आहे. कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्येही मंगळवारी सकाळपर्यंत पाऊस झालेला नव्हता. पाण्याची मागणी होत असल्याने कोयना धरणातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. १०४ टीएमसीच्या वर गेलेल्या धरणात सध्या ९९.५३ टीएमसी एवढा साठा आहे.
गेल्या काही दिवसांत जवळपास पाच टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कोयना धरणात सध्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरण परिसरात यावर्षी आतापर्यंत ५२९७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.