सातारा : जिल्ह्यातील विविध विभागांत कंत्राटी पध्दतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध केला. बंद करो..बंद करो, शोषण करना..बंद करो, नौकरीयोंपे पडा हातौडा, बेचो चाय तलो पकोडा, सरकारला आमच सांगणं हाय, २०१९ ला निवडणूक हाय, कंत्राटींनी आणलं सरकार, आता कंत्राटीच घालवणार,अशा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.जिल्हास्तरीय शासकीय कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील हेमंत भोसले, स्वच्छ भारत मिशन विभागातील ऋषीकेश शिलवंत, महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाचे ऋषीकेश जाधव, करण जगताप, शकील मुजावर यांच्यासह प्रमुख कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, कंत्राटी पध्दतीने निर्माण केलेल्या पदावरील नेमणुकीच्या अटी शर्तीबाबत तसेच या पदावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित न करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक म्हणजे संपूर्ण राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे.
कंत्राटी पध्दतीने विहित प्रक्रिया करून कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून आम्ही शासकीय योजनांची अविरतपणे अंमलबजावणी करीत आहे. निवड झाल्यानंतर सेवेत कायम करण्यात येईल, या भोळ्या आशेवर कर्मचारी आहेत. जिल्ह्यात सर्व विभागांत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास ८ हजारांच्या घरात आहे.
या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत शासकीय सेवेत कायम करण्यात आलेले नाही. उलट शासनाने नव्याने परिपत्रक काढले आहे की, कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रथमत: ११ महिन्यांसाठी तसेच जास्तीत जास्त तीन वेळा नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुन्हा निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागणार आहे.