- सचिन काकडे सातारा - रायगड तालुक्यातील उरण येथे एका तरुणीची व धारावीत (मुंबई) बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची अमानुष हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या सातारा बंदला दुकानदार, व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बजरंग दलाने शहरात सकाळी रॅली काढून निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही केली.
उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची एका तरुणाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटकही केली आहे. दुसरी घटना धारावी येथे घडली. येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांचीदेखील समाजकंटकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. या धर्मांध वृत्तीच्या समाजकंटकांवर शासनाने कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाकडून शुक्रवारी सातारा बंदची हाक देण्यात आली होती. गुरुवारी सायंकाळी समाजमाध्यमावर सातारा बंदचे मेसेज प्रचंड व्हायरल झाल्याने दुकानदार, व्यापाऱ्यांमध्ये बंदबाबत चलबिचलता होती. शुक्रवारी सकाळी काही दुकानदारांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली. यानंतर हळूहळू सर्वच दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला. बंदमुळे गर्दीने गजबजणारा राजवाडा परिसर, चौपटी, राजपथ, खणआळी, खालचा रस्ता, पोवई नाका, बसस्थानक परिसरात दिवसभर शुकशुकाट पसरला. बंदची कल्पना नसल्याने कामकाजानिमित्त साताऱ्यात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना आल्या पावली माघारी जावे लागते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी हिंदू जनजारण समिती, विश्व हिंदू परिषद, शिव प्रतिष्ठान तसेच बजरंग दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात बजरंग दलाचे हेमंत सोनावणे, हिंदू जनजगारण समितीच्या रूपाली महाडिक, हिंदू महासभेचे धनराज जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जितेंद्र दामले, मातृशक्ती विभागाच्या विद्या कदम, विश्व हिंदू परिषदेचे विजय गाडवे, जितेंद्र वाडेकर आदींनी सहभाग घेतला. या आंदोलनानंतर बजरंग दलाकडून शहरात रॅली काढण्यात आली. रॅलीत हत्येच्या दोन्ही घटनांना तीव्र निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांकडून निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. दुपारी दोननंतर शहरातील काही दुकाने उघडण्यात आली.