मायणी : खटाव, माण तालुक्यांच्या विविध भागातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील म्हशी चोरून मिरजमधील कत्तलखान्यांमध्ये विक्री करणाऱ्या दोघांसह एक व्यापाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तसेच चोरीच्या म्हशी नेण्यासाठी वापरलेले वाहनही ताब्यात घेण्यात मायणी पोलिसांना यश आले आहे. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरारी असून, पोलीस त्याच्या मागावर आहेत.याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, वडूज, म्हसवड व औंध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या गावांतील म्हशी चोरणारी टोळी सक्रिय झाली होती.
सुमारे आठ म्हशी चोरीला गेल्याची माहिती मिळाली होती. यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार केले.माहितीगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे विटा (जि. सांगली) येथील धीरज राजू पवार व अश्विनकुमार संजय कदम यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी चोराडे येथील दोन, विखळेतील दोन व ढोकळवाडी (ता. खटाव) येथील एक आणि कुकुडवाड (ता. माण) येथील एक अशा सहा म्हशी चोरल्याची कबुली दिली.तसेच या चोरीच्या म्हशी मिरज (जि. सांगली) येथील कत्तलखान्यांमध्ये नेण्यासाठी वापरण्यात येत असलेले वाहन (एमएच १० बीआर ४४०२) ताब्यात घेण्यात आले. कत्तल खान्यांमधील एजंट तासीव निसार वड्डीला ताब्यात घेण्यात आले आहे. याचा मुख्य सूत्रधार संतोष विठ्ठल वायदंडे हा फरारी आहे.याकामी गुलाब दोलताडे, सुरेश हांगे, अरुण बुधावले, बापूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, विठ्ठल पवार, चंद्रकांत वाघमारे व विकास जाधव सहभागी झाले होते. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी हे अधिक तपास करत आहेत.