सातारा : जिल्ह्याने आतापर्यंत विविध अभियान, उपक्रमात गौरवास्पद कामगिरी केली असून, बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापन तर आदर्शवत आहे. आता तर राज्य शासनाच्या वतीने या गावातील घनकचरा व्यवस्थापनावर माहितीपट (डाक्युमेंट्री) तयार करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा पुन्हा राज्यात या यशोगाथेच्या निमित्ताने सर्वांसमोर जाणार आहे. जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
मागील १५ वर्षांपासून जिल्ह्याने विविध अभियान, उपक्रम व योजनांमध्ये नेत्रदीपक व यशस्वी काम केले आहे. काही दिवसांपूर्वी तर स्वच्छतेमुळे देशाच्या राजधानीत जिल्हा परिषदेचा गौरव झाला होता. आतातर आदर्श घनकचरा व्यवस्थानानेही सर्वदूर ख्याती मिळविली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा नावलौकिक सर्वदूर पोहोचला.
गेल्या वर्षभरापासून सातारा जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावर भर दिला आहे. याचाच परिणाम म्हणजे अनेक गावांनी यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी व स्वच्छता विभागाची टीम कार्यरत राहून कामांचा पाठपुरावा करीत आहे.
कºहाड तालुक्यातील बनवडी आणि नागठाणे (ता. सातारा) येथील कचºयावर मात करण्यात ग्रामपंचायतीला यश आले. या दोन गावांत ओला व सुका या कचºयांसाठी घंटागाड्या आहेत. तसेच या कचºयापासून गांडूळखत निर्माण करण्यात येत आहे. या खतापासून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत असून, गावाच्या विकासासाठी ते वापरता येत आहे. बनवडी आणि नागठाणेतील घनकचरा व्यवस्थापनाची माहिती सर्वदूर पोहोचल्याने आता राज्य शासनालाही याची दखल घ्यावी लागली. त्यामुळेच या गावांवर माहितीपट तयार करण्यात येत आहे. हा माहितीपट यशोगाथा म्हणून दाखविण्यात येणार आहे.
बनवडी व नागठाणेत माहितीपटासाठी चित्रीकरण झाले. बनवडीत सरंपच, माजी सरपंच, ग्रामस्थांची मुलाखत घेण्यात आली. घनकचरा व्यवस्थानचे चित्रीकरण झाले. नागठाणे येथेही पथकाने चित्रीकरण केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिंदे यांची मुलाखत घेण्यात आली.
जिल्ह्यातील बनवडी आणि नागठाणे गावातील घनकचरा व्यवस्थापनवर डॉक्युमेंट्री तयार होत आहे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. जिल्ह्यातील अशी अनेक कामे आहेत ती इतरांना प्रेरणादायी ठरली आहेत. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, स्वच्छता टीम, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद या सर्वांचा सहभाग राहिला. लोकांनीही विश्वास दाखविला. त्यामुळेच हे यश मिळाले आहे.-डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी