मलटण: घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती.. त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती, या काव्यपंक्तीप्रमाणे सुगरण चिमणींची घरटी तयार आहेत, त्यात प्रेम जिव्हाळा ठासून भरला आहे. सुगरण हा पक्षी आपल्या घरटी बांधण्याच्या कलेसाठी प्रसिद्ध आहेत.
सुगरणीचे घरटे सर्व पक्ष्यांमध्ये अधिक सुंदर व पाहण्यासारखी असतात. जून महिन्यापासून सुगरणीच्या विणीच्या हंगामाला सुरुवात होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत सुगरण चिमणा आपल्या जोडीदारासाठी अधिक उत्तम घरटे तयार करून ठेवतो.मलटण परिसरातील शेतांमध्ये अशी अनेक घरटी तयार आहेत. सप्टेंबर मध्यापर्यंत सुगरणीची ही घरटी रेडीपझेशन तयार आहेत. मलटण, वडजल, निंभोरे, नांदल परिसरातील विहिरींच्या झाडांवर सुरक्षितस्थळी अशी घरटी तयार आहेत.
कॅनॉलकडेच्या झाडांवर अशा घरट्याची संख्या सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर अशा घरट्यांच्या वस्त्यांमध्ये सत्तर ते ऐंशी घरटी पाहायला मिळत आहेत.