- प्रमोद सुकरे कराड - महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी आणखी एक भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते यांनी भाजपला बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.हा भूकंप झाल्यानंतर शरद पवार यांनी अचानक कराड येथील महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी हजारो समर्थकांनी गर्दी केली आहे.
थोरले पवार सकाळी अकराच्या सुमारास येथे येणार आहेत. मात्र सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी कार्यकर्ते जमले आहेत. हातामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे, घड्याळाचे फलक , आम्ही साहेबांसोबतच असे फलक हातात घेऊन हे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत.
'शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 'अशा घोषणांनी परीसर दुमदुमून गेला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते येथे एकत्रित आलेले दिसत आहेत. या ठिकाणचे नियोजन स्थानिक आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.