पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या कास परिसराच्या डोंगरमाथ्यावर भात लावणीस वेगाने सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकरी डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात व्यस्त झाले आहेत.
भाताच्या शिवारात रामा हो रामा... रामाच्या बागेमध्ये हो बागेमध्ये, पाऊस पडतो झिरमिरी झिरमिरी... माज्या बंधुच्या शेतावरी, ध्यान मला रामाचं ध्यान मला रामाचं.. .. मारूतीला रात्र झाली द्रोणागिरी जायाचं, शंकर म्हणे पार्वते... कुणाला तू ओढीत होतीस कुणाला तू सोडीत होतीस, वाईच्या डोंगरी गजबारल्या तोरणी ... ! अशा कित्येक पारंपरिक भलरी गीतांचे स्वर निनादू लागले आहेत.कास, बामणोली हा परिसर घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा परिसर सह्याद्रीच्या पर्वतरांगानी वेढलेला आहे. या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. जमिनी लाल माती व मुरमाड असल्याने येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भात, नाचणी, वरी ही पिके घेतात.या भागातील जमिनी निकृष्ट व डोंगर उताराच्या तसेच लाल मातीच्या असल्याने पिके चांगली येण्यास खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, जांभूळ, उंबर अशा झाडांची कवळे बांधतात. होळी या सणानंतर तरव्यांची भाजणी केली जाते.
पावसाळ्याला सुरुवात होताच जून महिन्यात याच तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची पेरणी करून लावणीसाठी २१ ते ३० दिवसांपर्यंत रोपांची योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने भाताच्या वावरात चिखल करून त्यामध्ये तरव्यांतील भातांच्या रोपांची लावणी करण्यात येते.डोक्यावर इरलीचा आधार घेऊन पोती, कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भात लावणी करत आहेत. दरम्यान, भात लावणी करत असताना करमणुकीसाठी व कामाचा कंटाळा येऊ नये, यासाठी तालावर भलरी गीते म्हणताना दिसत आहेत.भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता असल्याने लावणी करताना एकमेकांना मदत करत आहेत. त्यामुळे भल्या पहाटे सुरू होणारा बळीराजाचा दिवस संध्याकाळी सातपर्यंत शेतातच मावळत असल्याचे या परिसरात दिसत आहे.
पैरा परस्परांना मदत करण्याची प्रथावस्तू अथवा पैशाचा कोणताही मोबदला न घेता भात लावणी करण्यासाठी अनेकजण एकमेकांच्या कामासाठी मदत करतात. यालाच या परिसरात पैरा म्हणतात. यामुळे कमी वेळात भात लावणी होण्यास मदत होते. तसेच सर्वांच्या भात लावण्या सुरू असल्याने औताला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
परिसरातील संपूर्ण शेती पावसावर अवलंबून आहे. डोंगरमाथ्यावर उशिरा पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी उशिराने भाताच्या पेरण्या झाल्या. सध्या रोपांची वाढ चांगल्या प्रकारे झाल्याने परिसरात भात लावणीच्या कामास वेग आला आहे. अजून दोन आठवड्यांपर्यंत भात लावणी सुरू राहील. भात लावणी करताना आजही ही पारंपरिक भलरी गीते या परिसरात अस्तित्व टिकवून आहेत. यामुळे कामाचा कोणताही ताण जाणवत नाही.|- ज्ञानेश्वर आखाडे, कुसुंबीमुरा शेतकरी