कऱ्हाड : येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष मधुकर रैनाक यांच्या घरावर पालिकेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता कारवाई केली. विशेष म्हणजे पोलीस, अधिकारी कारवाई करण्यासाठी यंत्रणा घेऊन आले असता रैनाक व त्यांच्या आईने अंगणात रांगोळी काढून शाल, श्रीफळ देऊन अतिक्रमणविरोधी पथक अधिकाऱ्यांचे स्वागत केले. अन्यायकारक कारवाईचा त्यांनी गांधीगिरी करत निषेध केला.याबाबत माहिती अशी की, कऱ्हाड येथील शनिवार पेठेतील शिंदे गल्लीत आशिष रैनाक आई-वडिल, पत्नी, लहान भाऊ यांच्या समवेत राहतात. पालिकेकडून सात दिवसांपूर्वी कारवाईची नोटीस दिली होती.
आशिष यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यावर त्यांना समजले की, शहरातील १ हजार २३ जणांना नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामात पाच विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे.आशिष हे मंगळवारी सकाळी गरोदर पत्नीस दवाखान्यात घेऊन गेले होते. इतरांचे बांधकाम सोडून रैनाक यांच्याच घरावर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यंत्रणा घेऊन दाखल झाले. यामुळे संतप्त झालेल्या रैनाक यांनी गांधीगिरी करत राग व्यक्त केला. अंगणात रांगोळी काढून येणाऱ्या अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.यापूर्वी आत्मदहनाचाही प्रयत्नआशिष रैनाक यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम विरोधात पालिकेत २६ जानेवारी रोजी आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता.