सातारा : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी तर कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. तर मार्च महिन्यातच तापमानाने चाळीशी ओलांडल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात तर तापमानाने 41 अंशाचा टप्पा पार केला असल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून ऊन वाढू लागले. सुरुवातीच्या काळात कमाल तापमान 35 ते 36 अंशाच्या दरम्यान स्थिर होते. पण, 15 मार्चपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली. तीन दिवसांपूर्वी कमाल तापमान 39 अंशावर होते. शनिवारी तर साताºयातील कमाल तापमान 40.3 अंश नोंदले गेले. मार्च महिन्यातच तापामानाने 40 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे आगामी काळात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार आहे.
तापमान वाढल्याने उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास तर नागरिक घरात थांबणे पसंद करतात. तसेच काहीजण झाडाच्या सावलीत विश्रांती घेतात. शहरातील बागांच्या ठिकाणी नागरिक बसू लागले आहे. साताऱ्यात कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असले तरी ग्रामीण भागात ते 41 अंशापर्यंत पोहोचले आहे.
जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र आहेत. दुपारच्या सुमारास शेतकरी, मेंढपाळ वर्ग झाडाच्या सावलीत बसलेला दिसून येत आहे.