Satara: "ईडीच्या भीतीनं पक्षांतराचं माॅडेल चालणार नाही; महायुतीचा विधानसभेला पराभव निश्चित", पृथ्वीराज चव्हाण यांनी सुनावले
By नितीन काळेल | Published: July 22, 2024 07:42 PM2024-07-22T19:42:33+5:302024-07-22T19:42:39+5:30
Prithviraj Chavan Criticize BJP: आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
- नितीन काळेल
सातारा - भाजपच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठोकाठोकीची भाषा करतात. असे वक्तव्य त्यांना शोभणारे नाही. त्यांना याबद्दल काही वाटत असेल तर राजीनामा द्यावा. त्याचबरोबर आतापर्यंत भाजपने इडीच्या कारवाया केल्या. पण, एकाचाही निकाल लागलेला नाही. यापुढे ईडीची भीती दाखवून पक्षांतर करायला लावायचं माॅडेल चालणार नाही. विधानसभेला महायुतीचा पराभव निश्चीत आहे, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सातारा येथील शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, उदयसिंह पाटील, मनोहर शिंदे, निवास थोरात, अन्वर पाशाखान आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. कारण, देशभरात वर्षात जेवढ्या शेतकरी आणि मजुरांच्या आत्महत्या होतात. त्यातील ३७ ते ३८ टक्के आत्महत्या या महाराष्ट्रातील असून मागील तीन वर्षात ते दिसूनही आले आहे. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात राज्यात १२६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात. यामध्ये अमरावती विभाग पुढे आहे. हे राज्यासाठी भूषणावह नाही. केंद्र शासनानेही शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. दरडोई उत्पन्नातही महाराष्ट्र देशात १४-१५ व्या क्रमांकावर घसरलाय.
आयएएस प्रशिक्षणाऱ्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी प्रमाणपत्रे दिली. याबाबत दिल्लीतही गुन्हा नोंद झाला आहे. खरेतर केंद्र शासनाच्या डीओपीटी मंत्रालया अंतर्गत युपीएसी काम करते. या मंत्रालयाचे मंत्रीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. खेडकर प्रकरणात त्यांची जबाबदारी काहीच नाही का असे सांगून माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, युपीएससीच्या अध्यक्षांनीही राजीनामा दिलाय. ते गुजरातमधीलच आहेत. आणखी सहा वर्षे त्यांचा कार्यकाल असताना त्यांनी राजीनामा का दिला. पूजा खेडकर प्रकरणात ते जबाबदारी टाळणार का हा प्रश्न आहे. सरकारचाच हा गलथान कारभार आहे. याची सीबीआय चाैकशीच झाली पाहिजे. कारण, महाराष्ट्रात आज हजारो विद्याऱ्थी युपीएससीला बसतात. आई-वडिल जमिनी आणि दागिने गहान ठेवतात. त्यांच्या भवितव्याशी हा खेळच आहे.
महायुतीचा पराभव होईल असे उमेदवार देऊ; पाटणला आघाडीचा विजय
पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, आघाडीत विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत थोडी चर्चा झाली आहे. पण, महायुतीचा पराभव होईल या निकषावर आघाडी उमेदवार देईल. या निवडणुकीत महायुतीचा पराभव ठरलेला आहे. तसेच त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातही आघाडीचा विजय होईल, असा दावाही केला.