- नितीन काळेलसातारा - जून महिन्यात वेळेमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. टँकरची संख्याही २१८ वरून ३२ पर्यंत खाली आली आहे, तर सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांनाच पाणीपुरवठा केला जात असून, फलटण, कऱ्हाड, खंडाळा तालुक्यातील टँकर बंद झाले आहेत.
जिल्ह्यात गेल्या वर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे दुष्काळी स्थिती निर्माण झाली, तसेच टंचाईही वाढली होती. यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यापासूनच अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर मार्चनंतर टंचाईची दाहकता अधिक वाढली. यामुळे अडीच लाख नागरिकांना टँकरच्याच पाण्याचा आधार होता. मात्र, जून महिन्यात वेळेत मान्सून दाखल झाला, तसेच बहुतांशी भागात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे टँकरची संख्या कमी झाली आहे.
जिल्ह्यात ७ जून रोजी २१८ गावे आणि ७१७ वाड्यावस्त्यांना टँकरने, तसेच विहिरी, बोअरवेल अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यासाठी २१८ टँकरचा धुरळा पाणीपुरवठा करण्यासाठी उडत होता. मात्र, याचदरम्यान पावसाला सुरुवात झाल्यानंतर टँकरची संख्या कमी झाली. सध्या ४३ गावे आणि १६३ वाड्यांची तहान टँकर आणि अधिग्रहण केलेल्या विहिरींवर अवलंबून आहे. माण तालुक्यात टंचाई कमी झाली असली तरी सध्या २२ गावे आणि १५३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येतोय. १६ टँकरवर ५१ हजार नागरिकांची तहान भागत आहे. तालुक्यातील पांगरी, मोही, शेवरी, राणंद, भाटकी, वरकुटे म्हसवड, कारखेल, संभूखेड, हवालदारवाडी, रांजणी, हिंगणी, पळशी, पिंपरी, जाशी, भालवडी, पर्यंती, इंजबाव, परकंदी आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा होतोय, तर खटाव तालुक्यात फक्त ६ गावे आणि ४ वाड्यांसाठी टँकर सुरू आहे. मोळ, मांजरवाडी, नवलेवाडी, गारुडी, गारळेवाडी येथे टँकर सुरू आहेत. फलटण तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने टंचाई निवारण झाले. त्यामुळे टँकर बंद झाले. कोरेगाव तालुक्यात ९ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. १६ हजार नागरिक आणि १० हजार पशुधन टँकरवर अवलंबून आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात टंचाई अजून कायम आहे.
खंडाळा तालुक्यात टँकर बंद झाले; पण वाई तालुक्यात अजूनही ५ गावे आणि ६ वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. ३ टँकरवर ५ हजार नागरिक आणि ३ हजार ७११ जनावरांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात टँकर सुरू नाही. जावळीत एकाच गावाला पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर, सातारा आणि कऱ्हाड तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.