सातारा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात पक्षांतर्गत वाद उफाळला आहे. हा वाद थोपविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बारामतीत आपल्या निवासस्थानी बैठक घेऊन पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील आमदारांकडून विविध बाबी जाणून घेतल्या. लोकसभा निवडणूक अथवा उमेदवारीच्या अनुषंगाने एकाही मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे आमदारांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या पेचाच्या अनुषंगानेच पवारांनी सर्वांची मते जाणून घेतल्याची चर्चा आहे.
बालेकिल्ल्यातील खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा संघर्ष सुरू आहे. पक्षांतर्गत सुरू असलेल्या या संघर्षाची गंभीर दखल घेत पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी बारामतीमध्ये आपल्या ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी बैठक घेतली.
या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण यांनी हजेरी लावली होती.
बैठकीबाबत पक्ष नेतृत्वाने अतिशय गोपनीयता पाळली होती. खुद्द जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनाही कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती. केवळ आमदारांनाच रविवारी रात्री निरोप धाडण्यात आले होते. सोमवारी सकाळीच सर्व आमदार बारामतीत दाखल झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत असणारी नाराजी जिल्'ातील नेतेमंडळींनी खा. पवारांना सांगितली. या बैठकीतच लोकसभा उमेदवारीच्या अनुषंगाने खासदार पवार काही निर्णय देतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र ती फोल ठरली.
लोकसभा निवडणूक, उमेदवारी याबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. विधानसभा मतदारसंघांतील सध्याच्या परिस्थितीबाबत खासदार पवारांनी आमदारांकडून जाणून घेतले. लोकसभा व विधानसभा निवडणूक वेगवेगळी झाली तर काय चित्र दिसेल, याबाबत आमदारांची मते जाणून घेण्यात आली. विधानसभा निवडणूक असो अथवा लोकसभा निवडणूक जो उमेदवार द्याल, त्याचे काम करणार असल्याचे सर्व आमदारांनी खासदार पवार यांच्यापुढे स्पष्ट केले.सायंकाळी उदयनराजेंशी गुफ्तगूबारामतीमधील बैठक झाल्यानंतर खा. शरद पवार पुण्याला निघून गेले. मोतिबाग येथील त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी सहा वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनीही त्यांची भेट घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या भेटीत झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी उदयनराजे भोसले यांची समजूत काढून वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न खा. पवार यांनी या दोन्ही बैठकांच्या निमित्ताने केल्याची चर्चा आहे.