सातारा : शहर पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात बुधवारी रात्री दोन्ही राजेंच्या समर्थकांत जोरदार राडा झाला. या प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याच्यासह १५ ते १६ जणांवर दरोडा व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक असलेले सनी भोसले हे त्यांच्या मित्रांसह बुधवारी कास पठारावर गेले होते. तेथून परत आल्यावर ते पोलीस करमणूक केंद्राच्या परिसरात थांबले होते. यावेळी गाडी लावण्यावरून एकाबरोबर वाद झाला. या वादाचे पर्यवसान मारामारीत झाले. यावेळी सशस्त्र हल्ला झाल्याने सनी भोसले व त्यांच्या साथीदारांसह पाचजण जखमी झाले. जखमींना दाखल केलेल्या रुग्णालयाबाहेर गर्दी जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रात्री उशिरा या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलैश बडेकर, निखिल कीर्तीकर व त्यांचे अन्य साथीदार अशा एकूण १५ ते १६ जणांवर दरोडा, खुनाचा प्रयत्न यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांनी कोयता, गुप्ती, रॉडने हल्ला केल्याबरोबरच पिस्तुलाचा धाक दाखविल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके पाठविली आहेत. याबाबत सनी मुरलीधर भोसले याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो उदयनराजे समर्थक व माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर भोसले यांचा मुलगा आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वीही या गटामध्ये मारामारी झाली होती. तेव्हाही बाळू खंदारे याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.