सातारा : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. त्यामुळे अनेकजण जळालेल्या गाड्यांचा सांगाडा अक्षरश: भंगारात कवडीमोल भावाने विकत असल्याचे समोर आले असून, सातारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ९ गाड्या जळून खाक झाल्या आहेत.उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर महामार्गावर वाहने पेटण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. वाहनातील वायरिंगचे शॉर्टसर्किट झाल्यानंतर त्याचे ऊर्जेमध्ये रुपांतर होऊन आग भडकत असल्याचे काही वाहन चालकांचे म्हणणे आहे. अशा प्रकारच्या आगीमध्ये कोणत्याही वाहनाचा केवळ सांगाडाच उरतो. त्यामुळे ही वाहने भंगारातच विकावी लागतात. जुन्या वाहनांना विमा भरला जात नाही. त्यामुळे भरपाई मिळणे कठीणच होते.
पाच ते सहा वर्षांचे वाहन असेल आणि ते वाहन आगीत भस्मसात झाले तर एक तृतीयांंश रक्कम संबंधित मालकाला भरपाई म्हणून मिळत असते. परंतु जुन्या वाहनांना विम्यातून काहीच भरपाई मिळत नाही. त्यामुळे झालेले नुकसान संबंधित वाहन मालकालाच सोसावे लागते, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
उन्हाळ्याची तीव्रता अद्याप सुरू झाली नसली तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात ९ वाहने जळून खाक झाली आहेत. यातील कार आणि दोन ट्रक ही तीन वाहने अगदी नवी होती. या तिन्ही वाहनांना विमा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित ६ दुचाकी वाहनांना विमा नसल्यामुळे त्या मालकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले.