वडूज : शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाहतूकव्यवस्था व पार्किंग नसल्याने वडूज शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे चित्र वारंवार पाहावयास मिळत आहे.येथील शेतकरी चौक, बाजार चौक, कऱ्हाड रोड चौक, बाजारपेठ, शिवाजी चौक (आयलँड चौक) बस स्टँड हे वर्दळीचे ठिकाण असल्याने नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दहिवडी, कऱ्हाड, पुसेगावहून येणाऱ्या गाड्या बसस्थानकाकडे जाताना आयलँड चौकात वाहतुकीच्या कोंडीमुळे तासन्तास ताटकळत थांबावे लागते.
त्यामुळे या चौकात दिशादर्शक फलक तसेच कायम वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून होत आहे. तसेच यापुढे परिसरात नगरपंचायतीने पोलिसांच्या मदतीने सम-विषम पार्किंग व्यवस्था राबवावी. रस्त्यालगत असणारे अतिक्रमण, फळवाले व इतर व्यवसायधारकांना जागा उपलब्ध करून दिली तर ही जीवघेणी अडचण कायमस्वरुपी निकाली लागेल.