सायगाव (सातारा) : आशियाई महामार्ग ४७ वर गुटख्याची अवैधरीत्या वाहतूक करणारी कार पोलिसांनी सोमवारी पहाटे पकडली. या कारवाईत बारा लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी, पुण्याच्या दिशेने निघालेल्या कार (एमएच ११ सीजी ६७९३) गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांना मिळाली होती. त्यांनी हवालदार श्रीनिवास बिराजदार आणि उमेश लोखंडे यांना आनेवाडी टोल नाक्यावर सापळा लावण्याचे आदेश दिले.त्यानुसार बिराजदार आणि लोखंडे हे साध्या वेशात दबा धरून बसले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सातारा संबंधित कार आनेवाडी टोल नाक्यावर आली असता ती थांबवली. त्यात चालक-मालक असलेले सतीश जयवंत पवार (वय ४२, रा. गंगापुरी, वाई) आणि विनायक पांडुरंग जाधव (३५, रा. कणूर) त्यांच्या गाडीची तपासणी केली.
त्यावेळी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भुर्इंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.