सातारा : स्वच्छ आणि सुंदर सातारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, या उपक्रमालाच पालिकेकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.
राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी चक्क घंटागाडीच्या चाकाखाली कचरा साचलेला दिसून येत आहे. या अजब स्वच्छता मोहिमेची चर्चा सध्या या कॉलनी परिसरात रंगली आहे.
राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनी ही उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखली जाते. या वसाहतीमध्ये रोज सकाळी कचरा नेण्यासाठी घंटागाडी येत असते. ज्या ठिकाणी ही घंटागाडी उभी असते.
या घंटागाडीच्या चाकाखालीच मोठ्याप्रमाणात कचऱ्यांचे ढीग दिसत आहेत. हा कचरा ना पालिकेचे कर्मचारी उचलतात ना वसाहतीमधील नागरिक.
रोज सकाळी घंटागाडी येते. मात्र हा कचरा तसाच राहात आहे. हा कचरा घंटागाडी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिसत नाही का, असा प्रश्न वसाहतीमधील नागरिकांमधून विचारला जात आहे.
या कचऱ्याला केवळ पालिकेच्याच कर्मचाऱ्यांना जबाबदार न धरता उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवरही पालिकेने कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे. या कचऱ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.