सातारा : सातारा शहरातील सदर बझार परिसरात दारूच्या कारणातून दोघांना सुमारे ५० जणांच्या समुदायाने मारहाण केली. यामध्ये विटा आणि दगडांचा वापर करण्यात आला. या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.
याबाबत स्थानिकांकडून समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदर बझार येथील भीमाबाई आंबेडकरनगरमधील चौकात दारूच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. हे दोघे जण मद्य प्राशन करण्यासाठी आले होते. यादरम्यान वाद होत नंतर भांडण झाले. या भांडणाच्या वेळी विटा आणि दगडांचा वापर करण्यात आला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याला दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या मारहाणीत ५० ते ६० जणांचा समावेश होता. या मारहाणीवेळी जोरदार बाचाबाची आणि गोंधळ सुरू होता, असेही घटनास्थळावरून सांगण्यात आले.
--------------------------------