सातारा : साताऱ्यात दोन वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, शनिवारी ६.८ अंश सेल्सिअसवर पारा होता. त्यामुळे जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. महाबळेश्वरमध्ये शुक्रवारी मध्यरात्री शून्य अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे वेण्णालेक परिसरात हिमकण गोठले होते.महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव शनिवारी येथील पर्यटक व स्थानिक नागरिकांना आला. राज्यात उन्हाळ्याची सुरुवात झाल्याची चाहूल लागत असताना महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला.
शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजल्यापासून वेण्णालेक ते लिंगमळा परिसरात हिमकण गोठण्यास सुरुवात झाली. हिमकणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यामुळे सकाळी वेण्णा लेक लिंगमळा परिसरात पर्यटकाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.या हंगामातील सर्वात जास्त थंडीमुळे वेण्णा लेक परिसरात दवबिंदू गोठून हिमकण तयार झाले. येथील बोट क्लबच्या जेट्टीवर, स्ट्रॉबेरीच्या मळ्यात, फुले, पाने, गाड्यांच्या टपावर, घराच्या पत्र्यावर तसेच घराच्या बाहेर मळ्यामधील बादल्यांमध्ये साठवणूक केलेल्या पाण्यावर बर्फाचा पापुद्रा तयार झाला होता.
येथील तापमान शून्य ते दोनपर्यंत घसरल्याने अनेकजण वेण्णा लेक परिसरातील विहंगमय दृश्य पाहायला आले. वन विभागाच्या हद्दीतील स्मृतीवनमध्ये तर जणू काश्मीरमध्ये आल्याचा भास होत होता. तापोळा परिसरही कडाक्याच्या थंडीने पुन्हा गारठला. सर्वत्र दव पडत असून, जलाशयाकाठी थंडीची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटवाव्या लागत आहेत.