शिरवळ (सातारा) : खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागात मांढरदेव डोंगराच्या कुशीत वसलेल्या झगलवाडी गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी विहीर रात्रीत गायब झाली. यामुळे ग्रामस्थही चक्रावले आहेत. अज्ञात व्यक्तींनी जेसीबीच्या साह्याने सपाट करून टाकल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील झगलवाडी या गावाला ४१८ लोकसंख्याकरिता पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करण्यासाठी १९९५ मध्ये ग्रामपंचायतने कर्नवडी हद्दीत असलेल्या तिकाटणे नावाच्या शिवारात विहीर खोदली होती. या विहिरीवर असलेल्या मोटारीचे पाणीपुरवठा करण्यासाठी रिमोटद्वारे नियंत्रण करण्यात येते. दरम्यान, रविवार, दि. ३० रोजी विहिरीवरील पाणीपुरवठा करणारे मोटारीचे रिमोटचे नियंत्रण होत नसल्याने झगलवाडी ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा विभाग पाहणारे कर्मचारी संतोष पंडित यांनी प्रत्यक्षरीत्या विहिरीवर जाऊन पाहिले. त्यावेळी पाणीपुरवठा करणारी विहीर अज्ञाताने जेसीबीच्या साह्याने बुजवून टाकल्याचे निदर्शनास आले.
याबाबतची माहिती संतोष पंडित यांनी सरपंच भरत लिमण, ग्रामसेविका एस. एस. महांगरे यांना दिली. यावेळी संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली असता संपूर्ण विहीर जेसीबीच्या साह्याने बुजवल्याचे निदर्शनास येताच खळबळ उडाली. या घटनेमुळे झगलवाडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.