सातारा : सातारा सातारा शहर आणि परिसराला सलग दुसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने झोडपले. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाबरोबरच गाराही पडल्या. मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर हा पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाण्याचे पाट वाहत होते.
सातारा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वळवाचा पाऊस पडत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे. तर सातारा शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी वळवाचा पाऊस झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी सवा चारनंतर दमदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी साडे तीननंतर काळे ढग जमा झाले. त्याचबरोबर अंधारून आले. बघता बघता पावसाचे टपोरे थेंब पडू लागले. त्यानंतर वळवाच्या धारा जोरदार पडू लागल्या. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. तसेच पाऊस सुरू झाल्यानंतर शहराच्या काही भागात गाराही पडल्या. पत्र्याच्या घरावर गारांचा टपटप असा आवाज येत होता. काही नागरिकांनी गारा वेचून खाण्याचा आनंदही घेतला. जवळपास एक तासभर चांगला पाऊस पडत होता.
दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत ढगांचा गडगडाट सुरूच होता. तसेच विजांच्या कडकडाटाने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
फोटो ०६ सातारा पाऊस फोटो नावाने...
फोटो ओळ : सातारा शहरात गुरुवारी सायंकाळी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत होते. (छाया : नितीन काळेल)