वाठार निंबाळकर : डिसेंबर महिन्यातच जिथे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागायची. लोकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागायचा. अशा फलटण तालुक्यातील मिरढे गावातील पाझर तलाव सध्या धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. ऐन उन्हाळ्यात हे पाणी पाहून ग्रामस्थांच्या चेहऱ्यांवरील दुष्काळाची तीव्रता नाहीशी झाली.फलटण तालुक्याच्या पूर्वेला असणाऱ्या असणारे मिरडे हे गाव कायम दुष्काळी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुबलक जमीन असूनही शेतीला पाणी नसल्याने गावातील अनेक ग्रामस्थ शेळ्या-मेंढ्या सांभाळून उदरनिर्वाह करतात.
मात्र, राज्य विधान परिषद सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे धोम बलकवडी धरणाचे पाणी आज फलटण तालुक्यातील शेवटच्या टोकाच्या मिरढे गावात आले आहे. या पाण्याने गावातील पाझर तलाव पूर्ण भरला आहे.गावातील सामाजिक कार्यकर्ते नामदेव काळे म्हणाले, आमच्या गावात आजपर्यंत दरवर्षी डिसेंबर महिन्यात पाणी टँकर लागत होता. मात्र, रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांमुळे आज गावात पाणी आल्याने अनेक वर्षात पहिल्यांदाच टँकर सुरू नाही.सरपंच संगीता लोंढे म्हणल्या, अनेक वर्षे जो तलाव पावसाळ्यात ही भरला जात नाही, तो आज उन्हाळ्यात धोम बलकवडीच्या पाण्याने भरला आहे. गावातील सर्व वडीलधारी मंडळी ज्यांना आपल्या गावात कधी पाणी येईल, असे वाटत नव्हते. आज ते मात्र, प्रत्यक्षात गावात पाणी आलेलं पाहून आनंदी झाली आहेत.