सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यात गेल्या दोन वर्षांत पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. तर माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सध्यस्थितीत टँकरमुक्त झाली आहेत. त्याचप्रमाणे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातीलही काही गावे टँकरमुक्तीच्या वाटेवर आहेत.राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता.
कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसऱ्या स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसऱ्या वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही सातारा जिल्ह्यातील २०० च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.गेल्या तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या स्पर्धेचा फायदा असा झाला की दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. माण तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास १५ गावांना यावर्षी टँकर सुरू करायला लागणार नाहीत.
शिरवली, सत्रेवाडी, बिदाल, परकंदी, परतवडी, सुरुपखानवाडी, पिंगळी खुर्द, वाकी, जाशी, थदाळे, कारखेल, मोगराळे, अनभुलेवाडी आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामधील कारखेल गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच पाण्यासाठी टँकर सुरू करायला लागायचा.
लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची. पण, यावर्षी तेथील चित्र बदलले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी असणारी विहीर सध्यस्थितीत भरलेली दिसून येत आहे. तर पाणी असल्याने उन्हाळी पिकेही शेतकऱ्यांनी घेतली आहेत. अशाचप्रकारे खटाव आणि कोरेगाव तालुक्यातील गावे टँकरमुक्त होत आहेत.