सातारा : चार दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने गोल मारुती परिसरातील संंतप्त नागरिकांनी सोमवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे समर्थ मंदिर-राजवाडा मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळीत झाली होती. ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचा प्रश्न बिकट झाल्याने नागरिकांनी पालिकेच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या.
शहरातील गोल मारुती मंदिर, तुळजाभवानी कॉम्प्लेक्स, साई हेरीटेज, साई पे्रस्टीज, बोकील बोळ, कोल्हटकर आळी, सुपनेकर पिछाडी या भागाला कास योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाता. परंतु गेल्या चार दिवसांपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या भागाला पहाटे सव्वा पाच तर सकाळी सव्वा सात वाजता पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही वेळेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना खासगी टॅँकरचा आधार घ्यावा, लागत आहे.
या बाबत उपाययोजना करण्यासाठी रहिवाशांनी पालिकेला वारंवार सूचना केल्या. परंतू पालिकेकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त नागरिक व महिलांनी सोमवारी सकाळी आठ वाजता राजवाडा-समर्थमंदिर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती मिळताच पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. यानंतर नागरिकांनी आंदोलन स्थगित केले.